जयपूर : शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सक्त आदेश राजस्थान सरकारकडून शिक्षकांना देण्यात आले आहेत. 13 डिसेंबर 2013 पासून सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना हा आदेश लागू असणार आहे. पाच सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी होणाऱ्या सरकारी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास एक दिवसाचा पगार कापला जाईल, असंदेखील राज्य सरकारनं आदेशात म्हटलं होतं. मात्र त्यानंतर एक दिवसाचा पगार कापण्याचा आदेश मागे घेण्यात आला.13 डिसेंबर 2013 रोजी वसुंधरा राजे सिंधिया यांनी राजस्थानाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जयपूरमध्ये होणाऱ्या सरकारी कामाला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. '13 डिसेंबर 2013 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना सरकारकडून आयोजित करणाऱ्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणं अनिवार्य असेल,' असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. या आदेशावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं टीका केली आहे. वसुंधरा राजे सरकारकडून शिक्षकांमध्ये भेदभाव का केला जात आहे?, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. 13 डिसेंबर 2013 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमाआधी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांची बैठक घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक दिनी होणाऱ्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास एका दिवसाचा पगार कापला जाईल, असंही आदेशात नमूद करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आदेशातील हे वाक्य वगळण्यात आलं.
भाजपाच्या काळात नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:08 PM