जयपूर :राजस्थानात एकीकडे काँग्रेसमधील कलह वाढत असताना आता भारतीय जनता पक्षातील (भाजप) गटबाजी आणि असंतोष चव्हाट्यावर येत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना बाजूला सारल्यानंतर नाराज असलेल्या समर्थकांनी थेट वेगळी गट स्थापन केली आहे. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांनी वेगळा राजकीय मंच स्थापन केला असून, वसुंधरा राजे समर्थक राजस्थान मंच असे याचे नामकरण करण्यात आले आहे. याशिवाय सोशल मीडियावरही हा मंच सक्रीय झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे समर्थकांनी राजस्थानमधील प्रत्येक जिल्ह्यात अध्यक्ष नेमण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय युवा संघटना आणि महिला संघटनांची स्थापना केली जात आहे. भाजपमध्ये अशा प्रकारे वेगळा गट स्थापन करण्याचा प्रकार प्रथमच घडत आहे.
वसुंधरा समर्थक मंचाचे प्रदेशाध्यक्ष विजय भारद्वाज यांनी सांगितले की, सन २००३ पासून वसुंधरा राजे यांच्यासोबत काम करत आहे. वसुंधरा राजे यांच्यामुळेच जनता दलाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपमध्ये राज्य कार्यकारिणीचा सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. भाजपच्या आमंत्रित कार्यकारिणीचाही सदस्य राहिलो आहे. याशिवाय विधी प्रकोष्ठ अध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता वसुंधरा राजे यांचे स्थान मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
दरम्यान, राजस्थानचे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. वसुंधरा राजे यांच्या समर्थकांनी स्थापन केलेल्या गटाविषयी राज्यातील सर्व नेते आणि केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहे. भाजप हा व्यक्ती आधारित पक्ष नसून, तो संघटनेवर आधारलेला पक्ष आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून सूचना येईल, तसा निर्णय घेतला जाईल, असे पूनिया यांनी सांगितले.