मुरैना, दि. 26 - मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळ्यातील एका आरोपीने न्यायायलात हजर होण्याआधीच आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण यादव असे या आरोपीचे नाव असून त्याला आज व्यापम घोटाळ्याप्रकरणी जबलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार होते. पोलिस अधिकारी आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितले की, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या महाराजपूर गावात राहणा-या प्रवीण यादव याने बुधवारी सकाळी राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. व्यापम घोटाळ्यातील हा आरोपी असून त्याला आज न्यायायलात हजर व्हावे लागणार होते. दरम्यान, त्याने न्यायालयात हजर रहावे लागणार असल्याच्या भीतीमुळे आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली असून तपास सुरु आहे. व्यापम घोटाळ्याप्रकरणी प्रवीण यादव याला 2012 मध्ये आरोपी बनविले होते. त्याची एसआयटीमार्फंत चौकशी करण्यात आली होती. त्याला आज जबलपूर येथील उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार होते.
काय आहे मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळा?मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठय़ा गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये आजवर 24 आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित 50 जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठय़ा असामींसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली आहे.पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देणे, सरकारी नोकरीमध्ये नियुक्त्या करणे अशा गैरप्रकारांना 2009 पासून सुरुवात झाली. 3012 पर्यंत जवळपास 1020 विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र या सर्वांच्या अर्जाची छाननी केली असता एकाचाही अर्ज आढळून आला नाही, तर याच काळात 1087 अपात्र उमेदवारांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. यामुळे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना डावलण्यात आले. तसेच कंत्राटी शिक्षक, अन्ननिरीक्षक, पोलीस हवालदार आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्तीसाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये गैरव्यवहार करण्यात आले. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारांबाबत तक्रारी वाढल्यानंतर हा घोटाळा असल्याचे उघड झाले. इंदोरमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. आनंद राय यांनी हा घोटाळा उजेडात आणला.