“सातत्याने सावरकरांचा अपमान, राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करु”: रणजित सावरकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 11:35 AM2023-04-14T11:35:10+5:302023-04-14T11:36:33+5:30
Ranjit Savarkar Vs Rahul Gandhi: राहुल गांधी वीर सावरकरांचे हिंदुत्व कधी समजू शकले नाहीत, असे रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.
Ranjit Savarkar Vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात विधाने करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गट तसेच भाजप आणि शिंदे गटाने यावर नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक होत सावरकर गौरव यात्रा काढली. यातच आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींना थेट इशारा दिला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. आगामी कर्नाटक निवडणुकीमुळे राहुल गांधी हे सर्व करत आहेत, असा दावाही रणजित सावरकर यांनी केला आहे.
राहुल गांधी वीर सावरकरांचे हिंदुत्व समजू शकले नाहीत
राहुल गांधींच्या टिप्पणीवर रणजित सावरकर म्हणाले की, राहुल गांधी सावरकरांवर सातत्याने भाष्य करत असतात. आगामी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हे केले जात आहे. मला वाटते की, हे लोक वीर सावरकरांचे हिंदुत्व समजू शकले नाहीत. वीर सावरकरांचे हिंदुत्व कोणत्याही उपासना पद्धतीवर आधारित नसून राष्ट्रवादावर आधारित आहे. सावरकर स्वतः निरेश्वरवादी होते. त्यामुळे त्यांचे हिंदुत्व हे देवपूजेवर किंवा कोणत्याही धर्मग्रंथावर आधारित नाही, असे रणजित सावरकर यांनी नमूद केले. तसेच वीर सावरकरांचा सातत्याने होत असलेल्या अपमानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा रणजित सावरकर यांनी दिला.
दरम्यान, राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेनेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"