वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:03 PM2024-10-03T17:03:13+5:302024-10-03T17:04:45+5:30
Ranjit Savarkar reaction on Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: "सावरकर मांसाहारी होते, त्यांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे कर्नाटकचे मंत्री गुंडू राव म्हणाले.
Karnataka minister Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपाच्या नेतेमंडळींनी गुंडू राव यांच्यावर टीका केल्यानंतर आता वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर ( grandson Ranjit Savarkar ) यांनीही काँग्रेस आणि दिनेश गुंडू राव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी या वक्तव्याचा निषेध करत हे वक्तव्य म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच या कृत्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा (defamation case) करणार असल्याचेही जाहीर केले आहे.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केले. "सावरकर ब्राह्मण होते, तरीही ते गोमांस खात होते. त्यांचे विचार मूलगामी असले तरी त्यांनी आधुनिकता स्वीकारली. सावरकरांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे विधान गुंडू राव यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर रणजित सावरकर यांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. विधानाचा निषेध करतानाच त्यांनी कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, या विषयाव्यतिरिक्त रणजित सावरकर यांनी महाराष्ट्रातील काही गोष्टींबद्दलही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य लाचलुचपत मुक्त करावे लागेल. कारण लाचखोरीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतोय. बांगलादेशी, रोहिंग्या अफगाणी आणि पाकिस्तानी बेकायदेशीरपणे देशात स्थायिक झाले आहेत. देश वाचवायचा असेल तर त्यांना देशाबाहेर हाकलावे लागेल.
सावरकर पुढे म्हणाले की, आम्ही नागरी समाजाच्या सहकार्याने एनआरसी आणण्याच्या समर्थनात आहोत. केंद्र सरकार एनआरसी लागू करणार नाही, परंतु आम्ही ते नक्कीच करणार आहोत. महाराष्ट्रात घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आणि देशात अवैधरित्या येणाऱ्यांना हाकलण्यासाठी, एनआरसी चळवळीच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांनी एनआरसी चळवळीत भाग घेतला पाहिजे. कारण सुमारे ८० लाख ते १ कोटी घुसखोर महाराष्ट्रात घुसले आहेत. त्यामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने आहेत. हे घुसखोर स्लीपर सेलचे काम करतात, ज्यामुळे देशाचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.