Veer Savarkar Photo In Karnataka Assembly: कर्नाटक विधानसभेत वीर सावरकरांचा फोटो; काँग्रेसची आगपाखड, भाजपचाही जोरदार पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 04:08 PM2022-12-19T16:08:46+5:302022-12-19T16:10:23+5:30
Veer Savarkar Photo In Karnataka Assembly: सावरकरांचा फोटो लावायचा नाही तर काय दाऊदचा फोटो लावायचा का? अशी विचारणा भाजप नेत्यांनी केली आहे.
Veer Savarkar Photo In Karnataka Assembly: एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू असताना दुसरीकडे कर्नाटकच्या विधिमंडळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. वीर सावरकराच्या फोटोला कर्नाटक काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला असून, भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो लावल्याने गदारोळ झाला आहे. विधानसभा असेंबली हॉलमध्ये सावरकरांचा फोटो लावल्याने सरकारच्या या कृतीचा काँग्रेसने निषेध नोंदवला आहे. सावरकर ही वादग्रस्त व्यक्ती होती. त्यांचा फोटो असेंबली हॉलमध्ये लागता कामा नये, असे काँग्रेसने म्हटले. तर सावरकरांचा फोटो लावायचा नाही तर काय दाऊदचा फोटो लावायचा का? असा सवाल भाजपने केला आहे. या गदारोळात काँग्रेस आमदारांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांच्यासह इतर महापुरुषांचे फोटो हातात घेऊन जोरदार निदर्शने केली.
काँग्रेस आमदारांचे कर्नाटक विधानसभा अध्यक्षांना पत्र
कर्नाटक विधानसभेच्या असेंबली हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांच्यासह काँग्रेस आमदारांनी जोरदार निदर्शने केली. काँग्रेस आमदारांनी या संदर्भात कर्नाटक विधानसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले आहे. विधानसभेत महात्मा गांधी, बसवन्ना, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि स्वामी विवेकानंद यांचेही फोटो लावण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते तुरुंगात एक दिवसही राहू शकत नाहीत. काँग्रेसने देशासाठी त्याग केला असे तुम्ही वारंवार म्हणता. तुम्ही ज्या काँग्रेसबाबत बोलता ती काँग्रेस ही नाही. आजची काँग्रेस बोगस आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"