बंगळुरू - काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेत बदल करण्यावरून २३ ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे पक्षामध्ये निर्माण झालेल्या वादाला आता नवनवी वळणे मिळत आहेत. दरम्यान, सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांपैकी एक असलेल्या वीरप्पा मोईली यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. सोनिया गांधीकाँग्रेस पक्षासाठी मातोसमान आहेत, मात्र पक्षामध्ये नवी ऊर्जा फुंकण्यासाठी बदलांची गरज आहे, असे मोईली यांनी म्हटले आहे.सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मोईली यांनी हे विधान केले आहे. दरम्यान, हे पत्र माध्यमांमध्ये लीक झाल्याबद्दल मोईली यांनी खेद व्यक्त केला. तसेच यासाठी जबाबदार लोकांचा शोध घेण्यासाठी अंतर्गत तपास होऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही मोईली यांनी म्हटले आहे.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेले मोईली म्हणाले की, पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांच्या मनात पक्ष सोडून जाण्याचा कुठलाही विचार नाही. आम्ही सोनिया गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलेला नाही. दरम्यान, सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. तसेच कुणालाही पक्ष आणि पक्षनेतृत्वाचे हात कमकुवत करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.मोईली म्हणाले की, सोनिया गांधी या पक्षासाठी मातेसमान आहेत. आम्ही अजूनही त्यांचा सन्मान करतो. कुणाच्याही भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही. जर आम्ही त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी आम्ही खेद व्यक्त करतो, दरम्यान काँग्रेस सध्या कठीण काळातून जात आहे.
वीरप्पा मोईली म्हणाले, सोनिया गांधी आम्हाला मातेसमान, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 8:50 PM