नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांकडून पराभवाची कारणं देण्यात येत आहे. निवडणुकीत अनेक निर्णय चुकल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेसचे वरिष्ठनेते विरप्पा मोइली यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचे कारण सांगितले.
मोईली म्हणाले की, कर्नाटकमध्ये जेडीएस अर्थात जनता दल सेक्युलर पक्षासोबत युती केली नसती तर येथे काँग्रेसने सहज १५- १६ जागा जिंकल्या असत्या. लोकसभा निवडणुकीत युतीवर विश्वास ठेवणे सर्वात मोठी चूक होती, असंही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत युती ही मोठी चूक होती. माझ्या स्वबळावर लढण्याच्या तयारीला सर्वांनीच विरोध केला. त्यावर त्यांना विचारण्यात आले की, काँग्रेसच्या लोकांनीच तुम्हाला विरोध केला का, त्यावर ते म्हणाले की, सत्ता आणि पैशाच्या जोरावर हे झालं. माजी केंद्रीयमंत्री विराप्पा मोइली चिकाबल्लापूरमधून लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-जेडीएसचे उमेदवार होते. मात्र भाजपच्या उमेदवाराने येथे त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस युतीला केवळ एक जागा जिंकण्यात यश आले. तर भाजपने २५ जागांवर विजय मिळवला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. याआधी काँग्रेसनेते सलमान खुर्शीद यांनी देखील मोदींच्या लोकप्रियतेसमोर कुणाही टीकू शकलं नसल्याचे नमूद केले. तसेच मोदींच्या त्सुनामीत सर्वाकाही वाहून गेले, परंतु, आम्ही वाचलो, असंही खुर्शीद म्हणाले.