ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 31 - पाकिस्तानचा उद्दामपणा सुरुच असून गेले काही दिवस वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. राजौरी सेक्टरमध्ये केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान दुसरीकडे पाकिस्तानने मेंढर येथे केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात दोन जवान जखमी झाले आहेत. उधमपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, त्याआधी रविवारी रात्रीदेखील पाकिस्तानकडून आर.एस.पुरा सेक्टरमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला होता. रात्री 9 वाजता सुरू झालेला हा गोळीबार मध्यरात्री 3.30 पर्यंत सुरू होता. तुफान गोळीबार करत पाकिस्तानने भारतीय पोलीस चौक्यांना, नागरिकांना टार्गेट केले. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानकडून वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे सीमारेषेजवळील गावात राहणा-या नागरिकांचे जगणं मात्र मुश्किल झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्याने सीमेजवळच्या अनेक गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत.