केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत घणाघाती चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. कुठल्या राज्यामध्ये पाच पोलीस ठाण्यांमधून पाच हजार बंदुका आणि ६ हजार गोळ्या लुटण्यात आल्या. नैसर्गिक आपत्तीशिवाय कुठल्या राज्याला अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महुआ मोईत्रा पुढे म्हणाल्या की, कुठल्या राज्यामध्ये असं झालंय की, जिथे दोन प्रदेशांच्या मध्ये बफर झोन बनवावा लागलाय. येथील पर्वतीय प्रदेशातील लोक खोऱ्यात जाऊ शकत नाहीत आणि खोऱ्यातील लोक पर्वतीय भागात जाऊ शकत नाहीत. कुठल्या राज्यामध्ये जंगलांचं प्रमाण कमी झालंय. हे सगळं मणिपूरमध्ये घडलं. हे या डबल इंजिनच्या सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे.
समाजात पसरत असलेल्या द्वेषावरूनही महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, आता भाजीपाला हिंदू झालाय आणि बकरा मुसलमान झालाय. अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यात आलंय. एक समाज दुसऱ्या समाजाविरोधात गुन्हे करत आहे आणि पीडितांना न्याय मिळत नाही आहे.
मोदी सरकारवरील हल्ल्याची धार वाढवताना अविश्वास प्रस्तावाबाबत महुआ मोईत्रा म्हणाल्या की, आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे आकडे नाही आहेत. बीजेडीसह काही पक्षांनी आमची साथ सोडली आहे. मात्र आम्ही I.N.D.I.A बनून इथे सरकार पाडण्यासाठी आलेलो नाही आहोत. तर आम्ही इथे काही तरी नवनिर्माण करण्यासाठी आलो आहोत. हा अविश्वास प्रस्ताव काही पाडण्यासाठी नाही, तर काही तरी समोर आणण्यासाठी आणला गेलाय. हा अविश्वास प्रस्ताव I.N.D.I.A बाबत विश्वास निर्माण व्हावा म्हणून आणण्यात आला आहे.