मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये शनिवारी एक भावूक दृश्य पाहायला मिळाले. भाजी विकत असलेल्या सलमान खानजवळ अचानक पोलिसांची गाडी थांबली. भाजीवाल्याने घाबरून पाहिलं असता DSP संतोष पटेल हे त्याचं नाव घेत होते. सलमानने त्यांना सॅल्यूट केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तू मला ओळखतोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर सलमानने हो, खूप चांगलं ओळखतो, तुम्ही भाजी घ्यायला यायचात असं म्हटलं.
संतोष पटेल आणि सलमान यांची ही भेट तब्बल १४ वर्षांनंतर झाली. इतक्या वर्षांनी दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पटेल यांनी भोपाळमध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असताना घडलेला एक प्रसंग सांगितला. इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, पन्ना येथील माझ्या १२० लोकांच्या कुटुंबातील मी पहिला पदवीधर आहे. मी माझ्या कुटुंबातील पहिला पोलीस अधिकारी आहे. सर्व अडचणी असूनही मी भोपाळला शिक्षण घेण्यासाठी आलो आणि नंतर एमपी लोकसेवा आयोगाची तयारी केली. असे दिवस होते जेव्हा माझ्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते. सलमाम इतका दयाळू होता की, त्याने मला टोमॅटो आणि वांगी दिली होती.
सलमान म्हणाला, पोलीस व्हॅन आल्यावर मी घाबरलो. पण जेव्हा मी पटेल यांना पाहिलं तेव्हा मला माझा जुना मित्र सापडला. मी हजारो लोकांना भाजी विकली पण माझा चेहरा कोणाला आठवत नाही. पण पटेल आले आणि येऊन मला भेटले. मी त्यांना सोशल मीडियावर फॉलो केलं आणि अधिकारी झाल्यावर खूप अभिमान वाटला. ते मला भेटतील हे मला माहीत नव्हतं. त्यांनी मला मिठाईचा बॉक्स आणि काही रोख रक्कम दिली. माझं स्वप्न सत्यात उतरल्या सारखं वाटतंय.
सलमाम आणि पटेल यांची पहिली भेट २००९-१० मध्ये झाली होती. त्यावेळी पटेल हे पन्ना येथील देवगाव येथून भोपाळला आले होते. त्यांचे वडील एक शिल्पकार होते. त्यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्य पोस्टमन म्हणून काम करत होते. पटेल यांच्या मोठ्या बहिणीचं लहान वयात लग्न झालं. जुने दिवस आठवून पटेल म्हणाले, मी दिव्याखाली अभ्यास करायचो आणि अनेकवेळा जेवणासाठी पैसे नसायचे. उदरनिर्वाहासाठी मी छोटी कामं केली. तेव्हा माझी सलमानशी मैत्री झाली होती.