रमेश शिंदे, औसा : मागील वर्षीच्या कमी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पावसाअभावी भीषण पाणीटंचाई जाणवत असली तरी आता हे कमी पावसाचे लोण आता गोर गरीबांच्या चुलीपर्यंत येऊन ठेपले आहे. पावसाअभावी डाळवर्गीय शेती मालाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले, तर आता पाण्याअभावी भाजीपाला उत्पादनातही मोठी घट झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाज्या आणि डाळी दोन्हींचेही भाव आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. औसा तालुका हा तसा खरीप हंगामाचा तालुका असून, तुरीचे उत्पादन तालुक्यात बर्यापैकी घेतले जाते. मागील वर्षी खरीप हंगामातील पेरण्यासाठी तब्बल एक महिना उशिराने पाऊस झाला. त्यामुळे तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. १ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी केवळ १६ हजार हेक्टरवरच तुरीचे पीक होते. उडीद, मुगाची तर मागच्या वर्षी अल्प प्रमाणातच पेरणी झाली होती. रबी हंगामासाठी पाऊसच न झाल्याने हरभराही अल्प प्रमाणातच पेरला गेला. त्यामुळे यावर्षी तूर, मूग, उडीद व हरभरा या सर्वच डाळींच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तर पाणीच नसल्यामुळे यावर्षी भाजीपालाही नाही. शेतकर्यांकडे शेतीमध्ये जे काही उत्पादन निघेल, त्यामधील काही हिस्सा शेतकरी घरी ठेवत असतो. प्रत्येक वर्षी त्यामुळे शेतकर्यांकडे तूर, हरभरा आणि मूग या डाळी घरच्या असतात. पण यावर्षी मात्र या तीनही डाळवर्गीय पिकांचे उत्पादनच नसल्यामुळे आता शेतकर्यांच्या घरीही डाळी नाहीत, तर शेतकरी विहिरी, बोअरना असलेल्या पाण्यावर शेतामध्ये भाजीपाल्यांची लागवड करीत. पण विहिरी-बोअर यावर्षी हिवाळ्यातच आटल्यामुळे भाजीपालाही नाही, अशी अवस्था झाल्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तूरडाळीने शंभरी ओलांडली, तर हरभरा, मूग या डाळीही ७० ते ९० रुपये किलो या दरापर्यंत गेल्या आहेत. तर भाजीपालाही २० रुपयांपासून ८० ते १०० रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत.या संदर्भात बोलताना भाजीपाल्याचे कमिशन एजंट व आडते बाळू माळी म्हणााले की, आडतीवरच भाजीपाला येईनासा झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात भाजीपाला घ्यावा कसा आणि विकावा कसा, असा प्रश्न पडला आहे. पण सध्या ज्या शेतकर्यांकडे भाजीपाला आहे ते मात्र फायद्यात आहेत, असे सांगितले.
भाज्या, डाळी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पालेभाज्यांसह डाळींच्या भावाची गगनाला गवसणी
By admin | Published: May 22, 2015 12:24 AM