सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जवानांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनांपैकी एकाचा अपघात झाला आहे. हा अपघात मेटापलायमजवळील बुर्लियार येथे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. गाडीचा अपघात झाल्यानंतर इतर वाहनांना घटनास्थळी पाचारण करून पार्थिव पुढे पाठवण्यात आले. दरम्यान, अनेक ठिकाणी पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनांवर स्थानिकांकडून पुष्पवृष्टी करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जवानांचा मृत्यू झाला. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान अपघात झालेल्या एमआय-सीरीज हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते. त्यापैकी फक्त एक अधिकारी जिवंत असून, तेही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
विमानाने मृतदेह दिल्लीत आणले जात आहेत
भारतीय वायुसेनेच्या C-130J सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टद्वारे सर्व 13 मृतदेह सुलूरहून दिल्लीत आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी हे आधीच सुलूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. आतापर्यंत जनरल रावत, त्यांची पत्नी आणि ब्रिगेडियर एलएस लिडर यांच्यासह चार मृतदेहांची ओळख पटली आहे.
अपघाताच्या चौकशीचे आदेशहेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत आपल्या भाषणात ही माहिती दिली. संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. याचे नेतृत्व एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंग करणार आहेत.