नवी दिल्ली : देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रविवार, १५ डिसेंबरपासून फास्टॅग प्रणाली सुरू होत असून, त्यामुळे वाहनचालकांना ताबडतोबीने फास्टॅग विकत घेणे गरजेचे झाले आहे. याआधी केंद्र सरकारने १ डिसेंबरपासून फास्टॅग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग प्रणाली सुरू होणार असली तरी ज्यांच्याकडे फास्टॅग नाही, अशा वाहनचालकांची अडचण होऊ नये, यासाठी काही काळासाठी तिथे एक लेन असेल. तिथे टोलची रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली जाईल. मात्र काही दिवसांनी ती बंद केली जाणार आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी आधीच फास्टॅग विकत घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.काही बँका, पेट्रोल पंप तसेच टोल नाक्यांवरील संबंधित कंपनीची कार्यालये येथे हे फास्टॅग विकत मिळू शकतील. आवश्यक तितक्या रकमेचा रिचार्जही करता येईल. ती रक्कम असेपर्यंत टोलनाक्यांवरील रांगेत अडकावे लागणार नाही आणि ती वाहने वेगाने जाऊ शकतील.
फास्टॅगची विक्री नोव्हेंबरात सुरू होताच आतापर्यंत ७0 लाख वाहनचालकांनी ते विकत घेतले आहेत. ही प्रणाली १ डिसेंबरपासून सुरू होणार हे २१ नोव्हेंबर रोजी जाहीर होताच २६ नोव्हेंबर या एका दिवशी १ लाख ३५ हजार लोकांनी ते विकत घेतले आहेत. वाहनचालकांना टोल नाक्यांवर रांगेत अडकण्याऐवजी फास्टॅग प्रणाली सोपी वाटत आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. फास्टॅगमुळे वेळ व इंधनाची मोठी बचत होणार असून, प्रदूषणही कमी होईल, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स या संस्थेने म्हटले आहे.
असा करा रिचार्ज
फास्टॅग असलेले वाहन संबंधित टोलनाक्यावरून जाईल तेव्हा टोलची रक्कम त्यातून आपोआप कापली जाईल; आणि वाहनचालकाच्या नोंदणीकृत मोबाइलवर तसा मेसेज येईल. फास्टॅगमधील रक्कम संपताच वा कमी होताच, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे तसेच बँका व किऑस्कवरून तो रिचार्ज करता येईल. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाके व आरटीओमध्ये ती सुविधा असेल.