महाभियोगावर लवकरच निर्णय घेणार व्यंकय्या नायडू, कायदेतज्ज्ञांकडून मागितला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 09:19 AM2018-04-23T09:19:30+5:302018-04-23T09:19:30+5:30
उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाच्या नोटिशीवर चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे.
नवी दिल्ली- उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाच्या नोटिशीवर चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीच रविवारी त्यांनी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यासह संविधान आणि कायदेतज्ज्ञाबरोबर सल्लामसलत केली. राज्यसभा सचिवालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, नायडू यांनी याचिकेला स्वीकारनं किंवा धुडकावण्यासंबंधी संविधान विशेषज्ज्ञ सुभाष कश्यप, पी. के. मल्होत्रासह अन्य कायदेतज्ज्ञांकडून सल्ला मागितला आहे. नायडू लवकरच विरोधी पक्षांच्या या नोटिशीवर निर्णय घेतील, अशीही चर्चा आहे. नायडू यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हैदराबादेतील त्यांचा दौरा रद्द करत कायदेतज्ज्ञांबरोबर बैठक घेतली. लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप, पूर्व विधी सचिव मल्होत्रा आणि न्यायिक प्रकरणाचे माजी सचिव संजय सिंह यांच्याशी या प्रकरणाचवर विचार-विमर्श केला आहे. तसेच नायडू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्याशीही बातचीत केली आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवण्यासाठी काँग्रेससह सात पक्षांचा महाभियोग प्रस्ताव
सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांना पदावरून दूर करण्यासाठी त्यांच्यावर महाभियोग चालविण्याची नोटीस काँग्रेससह सात विरोधी पक्षांनी शुक्रवारी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना दिली होती. सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाची औपचारिक तयारी केली जाणे ही अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल.जर नायडू यांनी ही नोटीस स्वीकारली तर प्रक्रियेनुसार विरोधकांनी लावलेल्या आरोपांसाठी त्यांना 3 न्यायाधीशांच्या सदस्यांची समिती गठीत करावी लागणार आहे.