नवी दिल्ली-
राज्यसभेत सोमवारी सभापती व्यंकय्या नायडू यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं निरोप समारंभ झाला. यावेळी सर्वपक्षीय खासदारांची व्यंकय्या नायडूंसाठी आभार प्रदर्शनपर भाषणं झाली. यात आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी व्यंकय्या नायडू त्यांचे पहिले चेअरमन असल्याची आठवण करुन दिली. ज्या पद्धतीनं पहिलं प्रेम लक्षात राहतं, तसंच पहिले चेअरमन म्हणून तुम्ही नेहमी लक्षात राहाल, असं राघव चड्डा म्हणाले. नायडू यांनी यावेळी राघव चड्डा यांचं संपूर्ण भाषण ऐकून घेतलं आणि त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली.
"प्रेम एकदाच होतं ना? दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा होत नाही ना?" असा प्रतिप्रश्न नायडू यांनी केला. त्यावर राघव चड्डा यांनीही मिश्किलपणे उत्तर दिलं. "मला याचा अनुभव नाही", असं राघव चड्डा म्हणाले. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. नायडू यांनीही आपलं म्हणणं पूर्ण करत मिश्किलपणे म्हटलं की, "पहिलं प्रेम चांगलं असतं. ते कायम राहायला हवं. आयुष्यभर तेच कायम राहायला हवं". नायडूंच्या या विधानानंतर सर्व सदस्यांनी बाकं वाजवून प्रतिसाद दिला.
व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. जगदीप धनखड ११ ऑगस्ट रोजी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती विराजमान होणार आहेत.