नवी दिल्ली: राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आलेल्या 85 खासदारांना आज सभागृहातून निरोप देण्यात आला. यावेळी या खासदारांनी निरोपाची भाषणे करताना आपले अनुभव सांगितले. यामध्ये काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांचे भाषण सर्वाधिक लक्षवेधी ठरले. त्यांनी युवा खासदार ते ज्येष्ठ खासदार असा संसदेतील प्रवास सर्वांसमोर मांडला. त्यांनी आपल्या भाषणात अनेक नेत्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी म्हटले की, व्यंकय्या नायडू अनेक 'किलो' पूर्वीपासून ओळखतात. अनेक लोकांनी माझ्या वजनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, व्यवसायिक जीवनात जास्त वजन असणे, हे श्रेयस्कर असते, असे विधान चौधरी यांनी केले. त्यावर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी रेणुका चौधरी यांची फिरकी घेतली. तुम्ही स्वत:चे वजन कमी करा आणि आपल्या पक्षाचे वजन वाढवण्याकडे लक्ष द्या, अशी शाब्दिक कोटी नायडू यांनी केली. त्यावर रेणुका चौधरी यांनी माझ्या पक्षाचे वजन सध्या योग्यच असल्याचे म्हटले. या दोघांच्या संभाषणामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. दरम्यान, रेणुका चौधरी यांनी आपल्या भाषणात अन्य नेत्यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, राजीव गांधी हे देशाला लाभलेले आजपर्यंतचे सर्वात उत्तम पंतप्रधान होते. त्यांना प्रचंड वलय लाभले होते. ते संसदेत असले की संपूर्ण सभागृह हाऊसफुल्ल असायचे. याशिवाय, अरूण जेटली हेदेखील एक उमदा माणूस आहे. अनेक मुद्द्यांवर आमच्यात वाद असले तरी ते नेहमीच माझ्याशी चांगले वागले, असे चौधरी यांनी सांगितले.
तुमचे वजन कमी करा आणि पक्षाचे वाढवा; व्यंकय्या नायडूंचा रेणुका चौधरींना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 5:16 PM