- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हेच भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील, हे शनिवारी निश्चित झाले. निवडणुकीत नायडू यांनी विरोधकांचे संयुक्त उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत १0 आॅगस्ट रोजी संपत आहे. नायडू यांचा शपथविधी ११ आॅगस्ट रोजी होईल. या विजयामुळे भारतात प्रथमच पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही तिन्ही पदे भाजपाकडे आली आहेत.नायडू यांना ५१६, तर गांधी यांना २४४ मते मिळाली. सकाळी १0 वाजल्यापासून संसद भवनात मतदान सुरू झाले. त्यात ७७१ संसद सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ११ मते अवैध ठरली, तर १४ जणांनी मतदान केले नाही. आजारी असलेले केंद्रीय मंत्री विजय गोयल व भाजपाचे सावरलाल जाट, तसेच काँग्रेसच्या मौसम नूर, राणी नराहा, राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, मुस्लीम लीगचे २ तृणमूलचे ४, तसेच पीएमकेचा एक अपक्ष दोन हे मतदान न करणारे खासदार होते. एकूण मतदान ९८.२१ टक्के झाले.लढा दोन विचारप्रवाहांमधील..!मतदानासाठी पंतप्रधान मोदी १0 वाजता संसदेत पोहोचले, तेव्हा तिथे रांग होती. त्यामुळे ते तिथेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्याशी गप्पा मारत थांबले. स्वत: नायडूही लवकरच तिथे पोहोचले. ते म्हणाले की, मी कोणा व्यक्ती वा पक्षाविरुद्ध ही निवडणूक लढवित नाही. अनेक पक्षांचा पाठिंबा असल्याने, मी प्रचारही केलेला नाही. दुसरीकडे गोपाळकृष्ण गांधी म्हणाले की, एनडीएचे उमेदवार नायडू हे अनुभवी नेते आहेत. आमच्या दोघांमध्ये स्पर्धा अजिबात नाही. हा लढा दोन विचारप्रवाहांमधील आहे.