भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह व काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. त्या राज्यात उज्जैन येथे महाकालेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्याचे दर्शन घेतल्यानंतर दिग्विजयसिंह म्हणाले की, हे महाकाल, ज्योतिरादित्य शिंदेंसारखे दुसरे कोणी काँग्रेसमध्ये पुन्हा जन्माला येऊ नये. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी सांगितले की, ‘देशद्रोही’ तसेच मध्य प्रदेशचे मोठे नुकसान करणारे दिग्विजयसिंह यांच्यासारखे लोक भारतात जन्माला येणार नाही याची भगवान महाकालेश्वराने काळजी घ्यावी.दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. त्याला शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च २०२०मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला व ते केंद्रीय मंत्री झाले.
दिग्विजयसिंह व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील शाब्दिक चकमकीबाबत भाजप नेते व मध्य प्रदेशचे मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया म्हणाले की, मध्य प्रदेश व काँग्रेसचे मोठे नुकसान करणाऱ्या दिग्विजयसिंह यांना पुढचा जन्म पाकिस्तानात व्हायला हवा. दिग्विजयसिंह हे पाकिस्तान समर्थक असल्याचा व ते देशाला कलंक असल्याची टीका वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री विश्वास सारंग यांनी केली.
अशी झाली होती उलथापालथ मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर २०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काही काळाने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २२ समर्थक आमदारांनी बंडखोरी करून काँग्रेसला रामराम ठोकला व भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अल्पमतात गेलेले कमलनाथ सरकार कोसळले. त्यानंतर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार सत्तेवर येऊन शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. या राज्यात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.