नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विरोधी पक्षांनी आज सायंकाळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच मत पत्रिका आणायची नसल्यास निवडणूक निकालांवेळी व्हीव्हीपॅटच्या मतांची आणि ईव्हीएममधील किमान 50 टक्के मतांची पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ गेले होते. या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांना सांगितले की, देशभरामध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर निवडणूक आयोगाने संमती दर्शवत या मुद्द्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
यापूर्वी विरोधी पक्षांनी ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने पुन्हा बॅलेट पेपरवर जाणे शक्य नसल्याचे सांगत मागणी फेटाळली होती. यानंतर विरोधकांनी दोन बैठका घेत किमान 50 टक्के व्हीव्हीपॅट मशिनवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.