नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची येत्या गुरुवारी मतमोजणी करताना मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करण्याआधी व्हीव्हीपॅट पडताळणी केली जावी आणि यात एका जरी मतात तफावत आढळली, तर त्या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदानयंत्रांमधील मतांची व्हीव्हीपॅट पडताळणी करून नंतरच मतमोजणी सुरू केली जावी, अशी मागणी २२ विरोधी पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली.
पुन्हा ‘रालोआ’चे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता वर्तविणारे एक्झिट पोलचे अंदाज व देशाच्या मतदानयंत्रे स्ट्राँगरूममधून अन्यत्र हलविली गेल्याच्या कथित बातम्यांवरून निर्माण झालेले शंकेचे वातावरण, यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांची सकाळी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत रणनीतीची आखणी केली. त्यानंतर, या पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.
आयोगाकडे वरीलप्रमाणे मागणी केल्याचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही सातत्याने आयोगाकडे हीच मागणी करीत आहोत. बुधवारी बैठक घेऊन यावर विचार करू, असे आयोगाने सांगितले. तृणमूलच्या शिष्टमंडळानेही आयोगाची भेटघेऊन भाजपने राज्यात घातलेल्या गोंधळाच्या तक्रारी केल्या.
सकाळच्या बैठकीत काँग्रेसतर्फे अहमद पटेल, गुलाम नबी आझाद व अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूलचे डेरेक ओ’ब्रायन, सपचे रामगोपाल यादव, द्रमुकच्या कणिमोळी, राजदचे मनोज झा यांच्यासह १९ पक्षांचे नेते सहभागी झाले होते.भाजपला बहुमत अशक्यच : विरोधकविरोधकांच्या बैठकीतही संभाव्य निकाल आणि त्यानंतर उचलावयाची पावले याबाबत चर्चा झाली. बहुसंख्य नेत्यांनी एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे सांगितले, तसेच मतमोजणीच्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भाजप व रालोआला बहुमत मिळणार नाहीत, असा दावा बहुसंख्य नेत्यांनी केला.