- हरीष गुप्ता नवी दिल्ली: ‘सीबीआय’मध्ये क्रमांक एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये गेले अनेक महिने सुरू असलेल्या अंतर्गत सुंदोपसुंदीमध्ये ‘रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या देशाच्या गुप्तहेर संस्थेसही ओढणे ही ‘सीबीआय’ संचालक आलोक वर्मा यांच्यासाठी ‘उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी’ ठरली आणि त्यामुळेच गेल्या मंगळवारी मध्यरात्री त्यांची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली गेली.सरकारमधील अत्यंत वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती देताना ‘लोकमत’ला सांगितले की, विशेष संचालक राकेश अस्थाना यांचे उट्टे काढण्याच्या नादात वर्मा यांनी ‘रॉ’ने दुबईत केलेले गोपनीय ‘आॅपरेशन’ही चव्हाट्यावर आणले, हे समजल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संताप अनावर झाला. त्यातूनच झटपट झालेल्या घडामोडींची इतिश्री वर्मा यांच्या गच्छंतीमध्ये झाली.‘सीबीआय’मध्ये विशेष संचालक या नात्याने क्रमांक दोनच्या पदावर असलेल्या अस्थाना यांच्याविरुद्ध संघर्षाचा खुला पवित्रा घेऊन त्यांच्याविरुद्ध लाच घेतल्याबद्दल गुन्हाही नोंदविल्याने वर्मा यांच्यावर सरकारची आधीच खप्पामर्जी झाली होती, हे खरेच. परंतु, अस्थाना यांच्याविरुद्ध नोंदविलेल्या प्रकरणामध्ये ‘रॉ’मधील क्र. दोनचे अधिकारी सुमंत गोयल यांचेही नाव घालणे, हे वर्मा यांच्या ‘पापांचा घडा भरण्याचे’ निर्णायक कारण ठरले.सुमंतकुमार गोयल हे उत्तम कामगिरीबद्दल नाव कमावलेले अधिकारी असल्याने ‘सीबीआय’ प्रमुखांनी आपले व्यक्तिगत हिशेब चुकते करण्यासाठी त्यांनाही या अंतर्गत वादात ओढावे, हे सरकारच्या बिलकूल पचनी पडले नाही. वर्मा यांनी अस्थाना यांच्याविरुद्धच्या ‘एफआयआर’मध्ये आरोपी म्हणून नव्हे तरी एरवीही गोयल यांचे नाव घालावे, हे सरकारच्या दृष्टीने सर्वस्वी अक्षम्य होते. ‘रॉ’चे सध्याचे प्रमुख येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त झाल्यानंतर त्या पदाचे प्रबळ दावेदार म्हणून गोयल यांच्याकडे पाहिले जाते. सूत्रांनुसार ‘सीबीआय’मधील भांडण विकोपाला गेल्यावरही कोणतीही टोकाची भूमिका न घेता संवाद आणि सलोख्याने मार्ग काढण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू होते. परंतु, सुमंतकुमार गोयल यांचे ‘एफआयआर’मध्ये नाव घालून कथित हवाला व्यवहार आणि ‘रॉ’मधील काही अधिकाऱ्यांशी त्यांचे असलेले संबंध याचा तपास करण्याचा पवित्रा वर्मा यांनी घेतल्यावर त्यांना सांभाळून घेण्याची सरकारची सहनशीलता संपली. ‘सीबीआय’मधील अंतर्गत वादात ‘रॉ’मधील क्रमांक दोनच्या अधिकाºयासही खेचण्याची कृती वर्मा यांच्यासाठी स्वत:चीच कबर स्वत:च्या हाताने खोदण्यासारखे ठरले.मोदी का संतापले?विश्वसनीय सूत्रांनुसार, वर्मा यांच्या या कृतीने कमालीचे अस्वस्थ झालेले ‘रॉ’चे प्रमुख अनिल धसमाना यांनी रविवारी २१ आॅक्टोबर रोजी थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे धाव घेतली. धसमाना मोदींना म्हणाले, ‘सर, ‘रॉ’ला ताळे ठोकणे अधिक चांगले होईल! आम्ही दुबईत केलेले गोपनीय ‘आॅपरेशन’ आपल्याच एका संस्थने चव्हाट्यावर आणल्याने आमच्या अधिकाºयांना धोका निर्माण झाला आहे! अशा परिस्थितीत आम्ही काम तरी कसे करावे?धसमना यांनी सांगितले की, सुमंत गोयल हे पूर्वी दुबईत ‘रॉ’चे प्रमुख होते. महेश प्रसाद व सोमेश प्रसाद ही दोन्ही ‘रॉ’चे माजी संचालक आर. आर. प्रसाद यांची मुले आहेत. प्रसाद हेही पूर्वी दुबईत ‘रॉ’चे प्रमुख होते.पंतप्रधानांनी असेही निदर्शनास आणले गेले की, महेश प्रसाद हे ‘इन्व्हेस्टमेंट बँकर’ आहेत, तर सोमेश प्रसाद स्वत:ची कंपनी चालवितात. या दोन्ही भावांनी गरज असेल, तेव्हा महत्त्वाची माहिती पुरवून ‘रॉ’ला मदत केलेली आहे. त्यामुळे सुमंत गोयल ‘रॉ’च्या ‘आॅपरेशन’चे प्रमुख असताना हे दोन्ही भाऊ त्यांच्याही संपर्कात असायचे.पहिली ठिणगी कशी पडली?च्हैदराबाद येथील एक व्यापारी सतीश बाबू साना यांची एक जबानी अस्थाना यांनी नोंदविल्याने या सर्व वादाची पहिली ठिणगी पडली.च्मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याविरुद्धच्या प्रकरणात जरा सबुरीने घेण्यासाठी आपण कुरेशी याच्यावतीने आलोक वर्मा यांना दोन कोटी रुपयांची लाच दिल्याचे साना यांनी त्या जबानीत सांगितले होते.च्या जबानीच्या आधारे अस्थाना यांनी वर्मा यांच्याविरुद्ध केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीव्हीसी) तक्रार केली.च्परंतु, या साना यांनी थोड्याच दिवसात पूर्णपणे पलटी खाल्ली व दंडप्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये दंडाधिकाºयांसमक्ष कबुलीजबाब दिला. त्यात त्यांनी मोईन कुरेशीला मदत करण्यासाठी मनोज प्रसाद आणि सोमेश प्रसाद या अस्थाना यांच्या ‘दलालां’ना २.९५ कोटी रुपयांची लाच दिल्याचा उलटा आरोप केला.च्मोईन कुरेशी यांच्याविरुद्धच्या प्रकरणात स्वत: आरोपी आहे. पण वर्मा यांनी अस्थाना यांच्याविरुद्धच्या ‘एफआयआर’मध्ये त्याचा साक्षीदार म्हणून उपयोग केला.
CBIvsCBI: ...म्हणून मोदींनी वर्मांना हटवलं; सीबीआयमधील उलथापालथीचं खरं कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 5:31 AM