भाजपाला सोडचिठ्ठी देत शत्रुघ्न सिन्हा झाले काँग्रेसवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 12:52 PM2019-04-06T12:52:56+5:302019-04-06T12:53:33+5:30
गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले.
पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक प्रसंगी थेट पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते फार काळ भाजपामध्ये राहणार नाहीत, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंडखोरीमुळे पाटलीपुत्र या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी नाकारून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. मात्र त्यांचा काँग्रेसप्रवेश लांबणीवर पडला होता. अखेरीस आज काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Delhi: Veteran actor and BJP MP Shatrughan Sinha joins Congress in presence of Congress General Secretary KC Venugopal and Randeep Surjewala pic.twitter.com/T1izPmSEEu
— ANI (@ANI) April 6, 2019
दरम्यान, ''भाजप हुकुमशाही पध्दतीने काम करु लागला आहे, वन मॅन शो झालाय. वन मॅन शो अॅन्ड इन टू मॅन आर्मी. हे दोघेजण मिळून पक्ष आणि सरकार चालवताहेत, अशी टीका खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केली होती,''
#WATCH: Shatrughan Sinha after joining Congress says, 'Shakti Singh Gohil ji (Bihar Congress In-charge) has been backbone of BJP in Bihar and in Gujarat,' corrects himself later. pic.twitter.com/ktaMjkkgSW
— ANI (@ANI) April 6, 2019
''नानाजी देशमुख यांनी मला घडवलं. त्यांनी मला अटलजी, अडवाणीजींच्या ताब्यात दिले. मला इतके प्रेम मिळाले, की मी त्यांच्यासोबत राहू लागलो. परंतु आमचा पक्ष अटलजी, आडवाणीजी यांच्यावेळच्या लोकशाहीतून हुकूमशाहीत बदलत गेला. सुरुवातीच्या काळात जसे सामूहिक निर्णय घेतले जात होते, ते आता संपुष्टात आले. अधिकारशाही (आॅथेरेटियन रुल) सुरु झाली. संवाद बिलकुल संपला. आपण आडवाणीजी, डॉ. मुरली मनोहर जोशीजी, विद्वान यशवंत सिन्हाजी व अरुण शौरींबाबत काय झाले, ते आपण पाहताच आहात. हे लोक आडवाणीजींचे समर्थक आहेत, असे त्यांना वाटले असावे. किंवा मी सत्य आणि सिध्दांतांंवर अधिक जोर देतो आहे, असेही त्यांना वाटले असेल. परंतु मांजरीला खोलीत बंदिस्त केलं आणि तिला रस्ता मिळाला नाही तर ती पंजा तर मारेलच ना. इतके होऊनही मी म्हणालो होतो, की मी पक्ष सोडणार नाही, हवे तर पक्षाने मला काढून टाकावे. परंतु ते मला काढूच शकले नाहीत.'' असे ते लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.