Bharat Ratna To LK Advani: भाजप नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान होत असल्याने खूप खूश आहे. त्यांच्याशी बोलून हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ते आपल्या काळातील सर्वाधिक आदर असणारे राजकीय नेते असून भारताच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. तळागाळात काम करण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशाच्या उपपंतप्रधान होण्यापर्यंत पोहोचला. त्यांनी देशाचे गृहमंत्री व माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. अडवाणी यांची संसदीय कारकीर्दही समृद्ध राहिलेली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर लालकृष्ण अडवाणी यांचे सुपुत्र जयंत अडवाणी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार दिल्याबाबत सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कुटुंबासाठी, देशासाठी आणि आम्हा सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. राम मंदिरासाठी १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा झाली. तेव्हापासून अनेक कायदेशीर बाबी आल्या. अनेक गोष्टी घडल्या. मात्र, आजच्या घडीला प्रत्यक्षात राम मंदिर सर्वांसमोर उभे राहिले आहे. राम मंदिराचे आंदोलन हे लालकृष्ण अडवाणी यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता. राम मंदिराचे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजले. खूप संघर्ष झाला. आंदोलन यशस्वी होऊन राम मंदिर बनल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, अशी प्रतिक्रिया जयंत अडवाणी यांनी दिली.
दरम्यान, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन केले.