नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात न्यूरोलॉजी विभागात लालकृष्ण अडवाणी यांना दाखल करण्यात आले. न्यूरो सर्जन डॉ. विनीत सुरी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची तब्येत स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अपोलो रुग्णालयानं एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये म्हटलं की, लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९६ वर्ष आहे. ते वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे अस्वस्थ आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
लालकृष्ण अडवाणी यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. लालकृष्ण अडवाणी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले.
लालकृष्ण अडवाणी हे भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत. लालकृष्ण अडवाणी हे गेल्या १० वर्षांपासून सतेत असलेल्या भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. लालकृष्ण अडवाणी हे दृढनिश्चयी आणि सक्षम नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.