नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी लोधी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी ओळख असलेल्या कुलदीप नय्यर यांनी देशातल्या नामवंत वृत्तपत्रांसाठी वार्तांकन तसेच स्तंभलेखन केले आहे. त्यांनी 14 भाषेतील 80 वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले आहे. तसेच, आणीबाणी आणि भारत-पाकिस्तानवर पुस्तक लिहिले आहे.
कुलदीप नय्यर यांचा जन्म ब्रिटीश भारतातील पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला होता. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते. सुरुवातील त्यांनी उर्दू रिपोर्टर म्हणून काम केले. देशात ज्यावेळी आणीबाणी लागू करण्यात आली, त्यावेळी ते द स्टेस्टमॅन दैनिकाचे संपादक होते. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती.
मानव हक्क चळवळीचे कार्यकर्ते असणारे कुलदीप नय्यर 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. याशिवाय, त्यांना 1990 मध्ये ब्रिटनमध्ये त्यांची भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली होती. तसेच, 1997 मध्ये त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून पाठविण्यात आले होते. 2015 मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
कुलदीप नय्यर यांनी डेक्कन हेराल्ड, द डेली स्टाल, द संडे गार्डियन, द न्यूज, द स्टेट्समन, पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन आदी वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. तसेच, बियाँड द लाइन्स, इंडिया - द क्रिटिकल इयर्स, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, द जजमेंट - इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग यासारख्या विविध राजकीय, सामाजिक विषयावरील पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.