कोलकाता - बंगाली सिनेसृष्टीतील आणि रंगमंचावरचे 'दिग्गज' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन झाले. रविवारी (१५ नोव्हेंबर २०२०) रोजी १२.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 85 वर्षांचे होते. गेल्या 40 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, कोलकत्याच्या 'बेले व्यू क्लिनिक' या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
सौमित्र याना 6 ऑक्टोबर रोजी कोरोना संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी करोनावर मात केली. मा, त्यांना श्वासोच्छवासात अडथळे जाणवू लागले होते. त्यांचं मूत्रपिंडही निकामी झालं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत आणखीनच बिघाड झाला. डॉक्टरांनी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलं होतं. पण, 40 दिवसांच्या संघर्षानंतर त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी 2004 साली पद्मभूषण तर 2012 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
सौमित्र यांच्या निधनानंतर चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या लाडक्या दिग्गज अभिनेत्याला सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुख्यंमंत्री ममता बॅनर्जी यांनीही बेले व्यू रुग्णालयात धाव घेतली आहे. वयाच्या 85 मध्येही ते सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर करू शकले नाहीत, त्यामुळेच कोरोनापूर्वीच त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे शुटींग केले होते.