नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी औरय्यामधील कढोरचा पुरवा येथे अखेरचा श्वास घेतला आहे. मुलायमसिंह हे तीन वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते. तसेच ते दोन वेळा औरय्याच्या विकासखंड भाग्यनगरचे तालुका अध्यक्ष देखील होते. मुलायम सिंह यादव हे समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निकटवर्तीय होते.
1949 मध्ये ते पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते कायम राजकारणात सक्रिय राहिले. पण, गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणापासून लांब राहिले होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यादव यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. आपण मुलायम सिंह यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे. "मुलायम सिंह यादव यांनी नेहमीच शेतकरी, गरीब आणि असहाय लोकांसाठी आपला आवाज उठवला. त्यांचे शहरात कोणतेही घर नव्हते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावात अगदी साधेपणाने घालवले" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.
"पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान"
अखिलेश यांनी "मुलायम सिंह यादव हे आयुष्यभर समाजवादी विचारधारेप्रती समर्पित राहिले. त्यांच्या निधनाने पक्षाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे" अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी मुलायम सिंह आजारी होते. कानपूरमधील एका रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावात शोक पसरला. मुलायम सिंह यादव यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरापुढे कार्यकर्ते आणि लोकांची गर्दी झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.