नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती (VHP leader Sadhvi Saraswati) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "लोक एक लाखाचा मोबाईल खरेदी करू शकतात तर मग एक हजाराची तलवार का नाही?, गाय़ीच्या रक्षणासाठी आता लोकांनी तलवारी हातात घ्याव्यात" असं विधान साध्वी सरस्वती यांनी केलं आहे. तसेच "ज्या दिवसापासून माझा जन्म झाला तेव्हापासून माझ्याकडे दोन संकल्प होते. एक म्हणजे प्रभू रामाचे मंदिर बांधणे आणि दुसरे म्हणजे भारतात गोहत्या बंद करणे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
फोनवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी लोकांनी गायींच्या संरक्षणासाठी तलवारी आणि शस्त्रे खरेदी केली पाहिजेत असं म्हटलं आहे. तसेच "जर लोकांना एक लाखाचा फोन विकत घेणे परवडत असेल तर ते आपल्या गायींच्या रक्षणासाठी नक्कीच तलवार खरेदी करू शकतात आणि घरात ठेवू शकतात. तलवारीच्या खरेदीमुळे लोक त्यांच्या देवी मातेचे (गायीचे) गोहत्येपासून संरक्षण करतील. आपला जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे हे माझे कर्तव्य आहे" असं साध्वी सरस्वती यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत केलं दफन; परिसरात एकच खळबळ
उत्तर प्रदेशमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. 50 हून अधिक गायींना जंगलात जिवंत दफन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील नरैनी नगर पंचायत येथील मोतियारी बाजारातील गोशाळेतील 50 गायींना जंगलात जिवंत दफन करण्यात आलं आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करून अधिकाऱ्याचं (EO) निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नरैनी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार राज करण कबीर यांनी या प्रकरणातील मुख्य दोषींविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करत येथी EO यांचं निलंबन केलं आहे.
मुख्य विकास अधिकारी वेद प्रकाश मोर्य यांच्या रिपोर्टनुसार तब्बल 50 गायींना जिवंत दफन करण्याच्या या प्रकरणात इओ प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून आले आहेत. तर दुसरीकडे भाजपा आमदार राज करण कबीर यांनी सांगितलं की, छोट्या अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पहाडी खेरा जंगलात 50 हून अधिक गायींना जिवंत दफन करण्यात आलं होतं. यामध्ये उपजिल्हाधिकारी नरैनीदेखील सामील होते असा आरोप केला आहे. कबीर यांनी मुख्य विकास अधिकारीच्या तपासावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच या घटनेचा तपास केला जात आहे.