नवी दिल्ली:नवरात्रीच्या काळात बांगलादेशमधील मंदिरे आणि देवी-देवतांच्या मूर्तींवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत निषेध नोंदवत विश्व हिंदू परिषदेने (VHP) बांगलादेश सरकारने हिंदुंचे संरक्षण करावे आणि या घटनांना जबाबदार असलेल्या जिहादींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून, याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी, असेही विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महासचिव मिलिंद परांदे म्हणाले की, रात्रीच्या अंधारात चटगाव येथील कोमिला क्षेत्रात मुद्दामहून षडयंत्र रचले गेले आणि कुराणाचा अपमान झाल्याची अफवा पसरवली गेली. यानंतर हल्लेखोरांनी दुर्गा पूजा मंडळावर हल्ला करत देवी-देवतांच्या मूर्तींची नासधूस केली. तोडफोड केली. यामुळे हिंदू समाज अतिशय दुःखी झाला आहे. हिंदूवरील अत्याचार आणि शोषण कायम असून, यातील घटनांमध्ये वाढ होत आहे, असे परांदे यांनी म्हटले आहे.
५०० जण जखमी आणि दोन जणांचा मृत्यू
मंदिरांवर झालेल्या हल्ल्यात दोन हिंदुंचा मृत्यू झाला असून, या घटनेत सुमारे ५०० जण जखमी झाल्याचे परांदे यांनी म्हटले आहे. बांगलादेशमध्ये दुर्गा पूजा उत्सवादरम्यान देवी-देवतांच्या प्रतिमेचा अपमान करण्यात आला. अशाच घटना सुरू राहिल्या, तर परिस्थिती बिकट होऊ शकते. याला कारण स्थानिक दहशतवादी संघटना आहे. त्यांच्या चिथावणीखोर अफवांमुळे हिंदूंवर आणि मंदिरे, देवी-देवतांच्या मूर्त्यांवर वारंवार हल्ले केले जात आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवणे आवश्यक
मिलिंद परांदे यांनी भारत सरकारने बांगलादेशातील या घटनांबाबत संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच हिंदूंवर होणारे हल्ले, अत्याचार यावरून भारताने बांगलादेशवर दबाव टाकायला हवा. तसेच हिंदूवर हल्ले, अत्याचार तसेच हिंदूंच्या मालमत्तांचे नुकसान करण्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी भारताने बांगलादेशची चर्चा करायला हवी, असे सांगत विश्व हिंदू परिषद बांगलादेशातील सर्व हिंदू समाजाच्या पाठिशी कायम राहील, असे परांदे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.