भारत-चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत भारतमातेच्या २० सुपुत्रांना वीरमरण आलं आहे. त्यांचं बलिदान कायम स्मरणात राहील, अशी भावना देशवासीय व्यक्त करत आहेत. देशाच्या सीमांवर लढताना अनेक जवानांना हौतात्म्य येतं. ते सगळ्यांनाच चटका लावून जातं. या शहिदांच्या कुटुंबीयांचा विचार मनात येतोच येतो. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून, तसंच काही दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत केली जाते. खरं तर, जवानांच्या हौतात्म्याचं मोल पैशांमध्ये होऊच शकत नाही. परंतु, कुटुंबाला थोडा आधार, या भावनेतून ही रक्कम दिली जाते.
जवान हे देशवासीयांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत असतात. त्यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबाला केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत योगदान देणं हे प्रत्येक देशवासीयाचं कर्तव्यच आहे. याच विचारातून विश्व हिंदू परिषदेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कल्पना सुचवली आहे.
जेव्हा भारतीय लष्कराच्या जवानाला वीरमरण येतं, तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यातून सवा रुपया घेऊन ती रक्कम शहीद जवानाच्या खात्यात जमा करावी, असं पत्र विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी पंतप्रधानांना लिहिलं आहे. या योगदानाच्या माध्यमातून, देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानाला प्रत्येक भारतीय नागरिक खरी श्रद्धांजली वाहू शकेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या सूचनेवर विचार करावा आणि या मदतनिधीसाठी परिपूर्ण कार्यप्रणाली तयार करून बँकांना योग्य निर्देश द्यावेत, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
शहीद जवानांच्या कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी
लडाखच्या गलवान खोऱ्यात बिहारमधील पाच जवान शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी 11 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला बिहार सरकारद्वारे नोकरी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या त्या विधानामुळे माजी सैनिक संतप्त, तीव्र शब्दांत व्यक्त केली नाराजी
भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!
कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"
दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव
'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना