गुडगाव : राम जन्मभूमी चळवळीत अग्रणी भूमिका बजावणारे विहिंपचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे मंगळवारी दुपारी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. न्यूमोनिया आणि अन्य आजारांसोबतच श्वसनातील अडथळ्यामुळे ८९वर्षीय सिंघल यांना गेल्या शनिवारी स्थानिक मेदांता मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी सिंघल यांच्या निधनाची माहिती दिली. सिंघल यांचे पार्थिव रात्री रामकृष्णपुरम् येथील विहिंपचे कार्यालय तसेच केशवकुंज संघ कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजता स्थानिक निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जातील. १९२६मध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जन्मलेले सिंघल २० वर्षे विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष राहिले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डिसेंबर २०११मध्ये त्यांनी हे पद सोडले. सिंघल हे १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात राम जन्मभूमी चळवळीमुळे प्रकाशझोतात आले होते. सिंघल यांनी अविवाहित राहून रा.स्व. संघाच्या प्रचारकाची भूमिका बजावली. १९९२ मध्ये बाबरी मशीद विध्वंसाच्यावेळी सिंघल यांनी कारसेवकाच्या आक्रमक भूमिकेत आंदोलन छेडले होते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून धातूविज्ञान अभियांत्रिकीची पदवी मिळविली होती. त्यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्याची चळवळ उभारत आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविले होते.अयोध्येत राममंदिर अंतिम इच्छादोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष तोगडिया यांनी सिंघल यांची रुग्णालयात भेट घेतली तेव्हा त्यांनी मला काहीही झालेले नाही. आता तर अयोध्येत भव्य राममंदिर बनवायचे असे उद्गार काढले होते. यावर्षी १३ जून रोजी अयोध्येला दिलेली भेट अखेरची ठरली. ते १४ ते २९ जूनपर्यंत श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या बैठकीत सहभागी झाले होते. व्हीलचेअरवरून रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर बनावे; मात्र त्यासाठी हिंसाचार होऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती.ंमोठे वैयक्तिक नुकसान- मोदीसिंघल हे माझ्यासाठी एखाद्या संस्थेप्रमाणे होते. त्यांनी देशाची सेवा करण्यातच आयुष्य घालवले. त्यांच्या निधनामुळे माझे मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभल्यामुळे मी स्वत:ला सुदैवी समजतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथसिंग आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी सिंघल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि धार्मिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी विशेषत: गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे कायम स्मरण केले जाईल, असे लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटले.ं