अनेक बडे नेते पक्ष सोडून जात असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे. विभाकर शास्त्री यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून ट्विट करत विभाकर शास्त्री यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचं सदस्यत्व सोडल्यानंतर विभाकर यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रृजेश पाठक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.
विभाकर शास्त्री यांचा राजीनामा काँग्रेसच्या पक्ष संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच पक्ष सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता.