आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीचं प्रकरण दररोज नवनवी वळणं घेत आहे. दरम्यान, १३ मे रोजी सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी झालेल्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांनी विभन कुमार याने कुणाच्या सांगण्यावरून आपणास मारहाण केली, असा सवाल उपस्थित केला आहे.
एनएआयला दिलेल्या मुलाखतीत त्या दिवशीचा घटनाक्रम सांगताना स्वाती मालिवाल म्हणाल्या की, मी १३ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी मला ड्रॉइंग रुममध्ये बसवले आणि अरविंद केजरीवाल हे घरी असून, ते मला भेटण्यासाठी येत आहेत, असे सांगितले. तेवढ्यात अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार तिथे तणतणत आले. मी त्यांना विचारलं की काय झालं? अरविंद केजरीवाल येताहेत का, तेवढ्यात त्यांनी हात उगारला.
विभव यांनी माझ्यावर हाताने ७-८ फटके मारले. जेव्हा मी त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी माझे पाय पकडला आणि मला जमिनीवरून फरफटत नेले. त्यावेळी माझं डोकं टेबलावर आदळलं. मी खाली पडले तेव्हा त्यांनी मला लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मी जोराजोरात ओरडून मदत मागत होती. मात्र कुणीही माझ्या मदतीसाठी पुढे आला नाही, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, मी मोठ्याने ओरडत होते. तरीही मदतीसाठी कुणी ला नाही, ही खूप अजब गोष्ट होती. विभव यांनी एकट्याने मारहाण केली. त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली या सर्व बाबी चौकशीच्या चौकटीत आहेत. मी दिल्ली पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. मात्र मी या प्रकरणी कुणालाही क्लीन चिट देत नाही आहे कारण जेव्हा मी ड्ऱॉईंग रुममध्ये होते तेव्हा अरविंद केजरीवाल हे घरीच होते. मला खूप मारहाण करण्यात आली. मी ओरडत होते. मात्र कुणीही मदतीसाठी आलं नाही.
मी आता माझं काय होईल, माझ्या करिअरचं काय होईल, माझ्यासोबत हे लोक काय करतील, याचा विचार करत नाही आहे. मी इतर महिलांना सत्यासोबत उभं राहण्यास सांगत असते. तुमच्यासोबत काही चुकीचं झाल्यास अवश्य लढा, असं सांगत असते. त्यामुळे मी जर त्यांना असं आवाहन करत असेन तर मग मी आज कशी काय लढू शकत नाही, असा प्रश्न मी स्वत:ला विचारतेय, असं स्वाती मालिवाल यांनी सांगितलं.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वाती मालिवाल प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि न्याय मिळेल, असी प्रतिक्रिया दिली होती.