नवी दिल्ली : 9 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन करणार आहे. यादरम्यान गुजरातीलमधील अहमदाबाद पुन्हा एकदा जगाच्या नजरेसमोर येणार आहे. या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा रोड शो होणार आहे. अहमदाबाद विमानतळावर नरेंद्र मोदी स्वतः यूएई राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करतील आणि त्यानंतर विमानतळ ते गांधी आश्रमापर्यंत दोन्ही नेत्यांचा रोड शो होईल.
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भारतातील ही चौथी भेट असणार आहे. विशेष म्हणेज, शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे नरेंद्र मोदींना आपला मोठा भाऊ मानतात. दोन्ही नेत्यांच्या कारकिर्दीत भारत आणि यूएईमधील संबंध वेगळ्या पातळीवर आहेत. नरेंद्र मोदींनीही आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत सहा वेळा यूएईला भेट दिली असून ते पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा अबुधाबी येथील मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी जाणार आहेत.
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि नरेंद्र मोदी यांच्यातील समजुतीचा फायदा दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्यास झाला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये सुमारे 85 अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे आणि यूएई हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. पाच वर्षात पेट्रोलियम उत्पादनांचा व्यापार शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.
अनेक करार होण्याची शक्यता व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये दोन्ही देशांमध्ये अपारंपरिक ऊर्जा क्षेत्र, फूड पार्क आणि आरोग्य क्षेत्राबाबत अनेक करार होण्याची शक्यता आहे. या काळात दोन्ही देशांदरम्यान बिझनेस समिटही होणार आहे. व्यापार आणि गुंतवणुकीव्यतिरिक्त, भारत आणि यूएईमधील मजबूत संबंध भौगोलिक-राजकारणात देखील विशेष भूमिका बजावत आहेत. यूएईच्या माध्यमातून, भारत मध्य पूर्वमध्ये आपली पकड मजबूत करण्यात यशस्वी होत आहे, तर भारत आणि यूएई, इस्रायल आणि अमेरिका सोबत I2U2 कॉरिडॉर स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.