एस. पी. सिन्हा -
पाटणा : येथील मगध विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तब्बल ३० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आल्यानंतरही त्यांना पदावरून दूर करण्यात आलेले नाही. त्यांचा राजीनामा मागितलेला नाही वा कुलगुरूंनीही स्वत:हून राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे कुलगुरूंच्या नियुक्त्या करणारे राजभवनच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
बिहारचेशिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनीही कुलगुरू राजेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याची दोनदा मागणी केली आहे. तरीही त्यांना हटवण्याबाबत कुलपती असलेल्या राज्यपालांनी अद्याप काहीच हालचाल केल्याचे दिसत नाही. भाजपचे आमदार ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनीही राजभवनातील अधिकारीच भ्रष्ट व्यक्तींना कुलगुरुपदी बसवण्यास जबाबदार आहेत, या नेमणुकांमध्येही भ्रष्टाचार होतो, असा आरोप केला आहे.
राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाल्यानंतरही राजभवनातून त्यांचा राजीनामा का मागण्यात आला नाही, असा सवाल होत आहे.