नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच देशातील जवळपास २०० विद्यापीठांच्या कुलगुरूंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठांच्या कुलगुरूंनी एक संयुक्त निवेदन जारी करून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
संयुक्त निवेदनात कुलगुरू आणि इतर वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य फेटाळून लावले आहेत. गुणवत्तेच्या आधारावर कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कुलगुरू आपल्या कामात संस्थांचा सन्मान आणि नैतिकतेची काळजी घेतात. जागतिक क्रमवारीवर नजर टाकली तर भारतीय विद्यापीठांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत, असेही म्हटले आहे.
दरम्यान, संयुक्त निवेदन असलेल्या निवेदनावर १८० कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, एनसीआयआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, एआयसीटीई, यूजीसी इत्यादी प्रमुखांचाही समावेश आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?चार-पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील विद्यापीठांच्या कुलगुरूंबाबत मोठे वक्तव्य केले होते. देशातील सर्व विद्यापीठाचे कुलगुरू अपात्र आहेत. यांना काहीच येत नाही. केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या संघटनेचे म्हणून यांची निवड झाली आहे. हे फक्त त्यांच्या विचाराचे पाईक असल्याने त्यांची निवड झाल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.