देशाच्या पुढील उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी आज मतदान होत आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर, आजच मतमोजणीही होऊन निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने जगदीप धनखड तर विरोधी पक्षाने मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी केलं मतदान - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार, हे चित्रही आजच स्पष्ट होईल. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पोहोचत सर्वात पहिले मतदान केले. संसद भवनात मतदानासाठी खासदारांची रांग गालली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालेल. यानंतर आजच निवडणुकीचा निकालही येईल.
'मतदानापासून दूर राहणार TMC' -उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 788 मते आहेत. यांपैकी विजयासाठी एकूण 394 मतांची आवश्यकता आहे. मात्र, यातच आता तृणमूल काँग्रेसने (TMC) उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या या मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी खासदार शिशिर अधिकारी यांना पत्रही लिहिले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते शुभेंदु अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात, टीएमसीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुदीप बंदोपाध्याय यांनी म्हटले आहे. शिशिर अधिकारी यांनी 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. ते टीएमसीच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते.- माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे खासदार डॉ. मनमोहन सिंग यांनीही संसदेत पोहोचून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.
- भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.