नवी दिल्ली : उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या मोरोक्को आणि ट्यूनिशिया या आफ्रिकन देशांच्या पाच दिवसीय दौऱ्याचा सोमवारी प्रारंभ झाला. त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये दिल्लीत आयोजित भारत-आफ्रिका शिखर परिषदेतून आफ्रिकन देशांसोबत निर्माण झालेल्या सौहार्द्रपूर्ण संबंधाचा राजनैतिक पातळीवर लाभ मिळवण्याचा प्रयत्न या भेटीतून होणार आहे.भारताचे उपराष्ट्रपती ५० वर्षांनंतर प्रथमच या दोन देशांना भेट देत आहेत. या दोन उत्तर आफ्रिकन देशांच्या नेत्यांसोबत ते दहशतवाद, संयुक्त राष्ट्र परिषदेचा विस्तार, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक तसेच आफ्रिकन देशांशी संपर्क वाढविण्यासह उपखंडीय मुद्यांवर चर्चेत भर देतील. मोरोक्कोचे पंतप्रधान अब्देलीलाह बेन्किरेन यांच्या निमंत्रणावरून भेट देत असलेले उपराष्ट्रपती अन्सारी १ जूनपर्यंत मोरोक्कोत थांबतील. राबात येथे इंडो- मारोक्को चेम्बर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीचे ते संयुक्तरीत्या उद्घाटन करतील. शिक्षण, माहिती- तंत्रज्ञान, दळणवळण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून क्षमता विकास आणि सांस्कृतिक आदान-प्रदानावर विशेष भर दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात ते २-३ जून रोजी ट्यूनिशियाला भेट देतील. ५० वर्षानंतर उपराष्ट्रपतींची भेटमोरोक्को स्वतंत्र होऊन ५० वर्षे झाली असताना भारताच्या उपराष्ट्रपतींनी या देशाला भेट देण्यालाही ५० वर्षे होणार आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये या आफ्रिकन देशाचा केलेला दौरा पहिली उच्चस्तरीय भेट ठरली होती. दिल्लीत आयोजित शिखर परिदेला मोरोक्कोचे राजे मोहम्मद (सहावे) हे भारताचे पहिले अधिकृत आफ्रिकन पाहुणे ठरले होते. आधुनिक इतिहासात भारत- आफ्रिकन नेत्यांची सर्वात मोठी राजकीय परिषद म्हणून या शिखर परिषदेची नोंद झाली. (वृत्तसंस्था)
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी मोरोक्को भेटीवर
By admin | Published: May 31, 2016 6:22 AM