Vice-President Jagdeep Dhankhar : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, मात्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशातील काही भागात निवडणुका आणि लोकशाही निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या काही भागांत लोकसंख्येचा समतोल इतका ढासळला आहे की, तिथं निवडणुकांना आणि लोकशाहीला काही अर्थ उरलेला नाही. तिथं निकाल काय लागणार, हे आधीच माहीत असतं, असं म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जयपूर येथे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
लोकसंख्येच्या बदलामुळं देशातील अनेक भाग राजकीय बालेकिल्ले बनले आहेत. तिथे निवडणुका आणि लोकशाहीला काही अर्थ नाही, कारण निकाल आधीच ठरलेले असतात. जगात लोकसंख्या बदल हे एक आव्हान बनत आहे. हे अत्यंत चिंताजनक आव्हान पद्धतशीरपणे हाताळले नाही तर ते अस्तित्वाचे आव्हान बनेल, असं जगात घडलं आहे. या लोकसंख्येच्या विकारामुळं, लोकसंख्येच्या भूकंपामुळं ज्या देशांनी आपली १०० टक्के ओळख गमावली आहे, त्या देशांची नावं घेण्याची गरज नाही, असं म्हणत लोकसंख्येचा असा असमतोल अणुबॉम्बपेक्षा कमी घातक नाही, असंही उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.
याचबरोबर, आपली संस्कृती पाहा, आपली सर्वसमावेशकता आणि विविधतेतील एकता हे सकारात्मक समाजव्यवस्थेचे पैलू आहेत. खूप सुखदायक आहेत. आम्ही सर्वांचं मनमोकळेपणानं स्वागत करतो, पण त्याचा परिणाम काय होत आहे? याचा गैरफायदा चुकीच्या पद्धतीनं घेतला जात आहे. लोकसंख्येची अव्यवस्था, जातीवर आधारित दुर्भावनापूर्ण विभागणी आणि अशा प्रकारच्या इतर अनेक गोष्टींना धक्का बसत आहे आणि गंभीरपणे तडजोड केली जात आहे, असं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं.
संकटाला तोंड देण्यासाठी...कोणत्याही विशिष्ट राज्याचा किंवा प्रदेशाचा उल्लेख न करता उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, जेव्हा काही भागात निवडणुका येतात, तेव्हा लोकसंख्येची अराजकता लोकशाहीतील राजकीय असुरक्षिततेचा बालेकिल्ला बनत चालला आहे. देशात झालेला हा बदल आपण पाहिला आहे. लोकसंख्येतील बदल इतका मोठा आहे की, हा परिसर राजकीय गड बनतो. लोकशाहीला अर्थ उरला नाही, निवडणुकीला काही अर्थ उरला नाही. कोण निवडून येणार हे आपल्याला आधीच माहीत असतं. असे भाग आपल्या देशात आहेत आणि ते झपाट्याने वाढत आहेत. अशा संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला जात, पात, रंग, संस्कृती, श्रद्धा या भेदांच्या पलीकडं जावं लागेल. सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं.