Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. निवडणुकीची अधिसूचना ५ जुलै रोजी जारी करण्यात येणार असून या निवडणुकीसाठी मतदान ६ ऑगस्टला पार पडणार आहे, असे सांगण्यात आले. यासाठी १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचे मतदान २२ जुलैला पार पडणार आहे. त्याकरिता सत्ताधारी पक्षाकडून आदिवासी समाजातील महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक झाल्यानंतर दोन आठवड्यांतच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.
व्यंकय्या नायडू हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२२ ला संपुष्टात येत आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्याआधी त्या पदासाठी पुढील निवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. निवडणुकीच्या वेळी राज्यसभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतात. तर लोकसभेचे महासचिव हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतात.