उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत दोन आगीच्या घटना व एक चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. चेगराचेंगरीच्या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मौनी अमावास्येनिमित्त भाविकांचा लोंढाच एवढा आलेला की निमुळत्या संगमावर गर्दी आवरली नाही. यामुळे स्नानासाठी थांबलेल्या, झोपलेल्या लोकांवरून ही गर्दी गेली. आता उत्तर प्रदेश प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना माघारी पाठविण्यास सुरुवात केली आहे. संगमापासून तीन किमींवर कोणालाही थांबण्यास दिले जात नाहीय. अशी परिस्थिती असताना १ फेब्रुवारीपासून उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपतींसारख्या व्हीव्हीआयपींचे येणे जाणे होणार आहे.
एवढ्या गर्दीच्या ठिकाणी या महनीय व्यक्तींची ये-जा कशी केली जाईल असा सवाल आता उपस्थित होत आहे. भाविकांचे मोठेच्या मोठे लोंढे येतच आहेत. त्यांना नियंत्रित करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. जिल्ह्याचे चारही बाजुचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत व्हीव्हीआयपी व्यक्तींची व्यवस्था कशी करायची असे आव्हान योगींसमोर उभे ठाकले आहे.
चेंगराचेंगरीनंतर सामान्य भाविक आणि संतांकडून व्हीव्हीआयपींच्या येण्या-जाण्यावर सवाल केले जात आहेत. अशातच विरोधी पक्ष देखील हा मुद्दा उपस्थित करत आहेत. अद्यापही संगम परिसरात करोडो लोक आलेले आहेत. महाकुंभाला एक इव्हेंट बनविण्यात आल्याचा आरोप खुद्द श्री पंचदशनाम जूना आखाडा आणि निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वरांनी केला आहे.
महाकुंभला रोज कोण ना कोण नेता येत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी रस्त्याची एक बाजू पूर्णपणे भाविकांसाठी बंद केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक मंत्री आले-गेले आहेत. रस्ताच बंद केला जात नाही तर पूल देखील बंद केले जात आहेत. यामुळे भाविक संतप्त झालेले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंगही तोडून टाकले आहेत.
मोदी कधी येणार...महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे एक फेब्रुवारीला येणार आहेत. तर मोदी ५ फेब्रुवारीला येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या १० फेब्रुवारीला येणार आहेत.