नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकंय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. बेशिस्तीवर काही बोलायला गेल्यास आज लोकशाहीविरोधी, हुकुमशहाची पदवी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू हे शिस्त पाळणारे व्यक्ती असल्याची प्रशंसाही मोदींना यावेळी केली.
संसदेमध्ये सभागृहात अध्यक्षपदी कोण बसतो, त्याची काय क्षमता आहे, कोणती वैशिष्टे आहेत यावर लोक लक्ष देत नाहीत. मात्र, सदस्याचे विचारच पुढे येतात. परंतू अधावेशन नसेल तर त्याच्या अध्यक्षपदावर कोण बसतो याच्याकडे सर्वांचे लक्ष असते. हा व्यक्ती कसा प्रशासन चालवत आहे, कसा सर्वांना रोखत आहे यावरून नायडू यांना जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचे मोदी यांनी सांगितले.
अधिवेशनाचे कामकाज चालू न देण्यावरून मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली. जर त्यांनी सभागृह ठीक चालू दिले असते तर व्यंकंय्या नायडू यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली नसती. यावेळी नायडू यांनीही स्मितहास्य केले. यावेळी काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, आनंद शर्मा यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांच्या 'मूव्हिंग ऑन... मूव्हिंग फॉरवर्ड: अ ईयर इन ऑफिस' या पुस्तकाचे प्रकाशन केले.