ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - आंतरराष्ट्रीय योग दिनी दिल्लीतील राजपथवर आयोजित कार्यक्रमात उप राष्ट्रपती हमीद अन्सारींची अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. उपराष्ट्रपतींना कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते असा खुलासा उपराष्ट्रपतीच्या कार्यालयातर्फे करण्यात आला असून पंतप्रधान मुख्य अतिथी असताना उप राष्ट्रपतींना निमंत्रण देता येत नाही असा बचाव एका केंद्रीय मंत्र्याने केला आहे.
रविवारी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात आला. दिल्लीतील राजपथवर विशेष योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांमध्ये बसून योगासन केली. या सोहळ्यासाठी मोदी सरकारचे सर्वत्र कौतुक होत असले तरी आता या सोहळ्यावरुन वादविवादाला सुरुवात झाली आहे. उप राष्ट्रपती हमीद अन्सारी या सोहळ्याला अनुपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपा नेते राम माधव यांनी ट्विटरद्वारे या मुद्द्याकडे लक्ष वेधले. काही वेळाने अन्सारी आजारी असल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते असे समोर आले. यावर राम माधव यांनी उपराष्ट्रपतींची माफी मागत याविषयी माहिती नसल्याने असे ट्विट केल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र रात्री उशीरा उपराष्ट्रपती कार्यालयाने या कार्यक्रमासाठी उप राष्ट्रपतींना निमंत्रणच दिले नव्हते असा खुलासा करत मोदी सरकारची कोंडी केली आहे.