हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : राजस्थानातील निवडणुकांच्या आधी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शासकीय दौऱ्यास राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विरोध केला असतानाही धनखड यांनी शनिवारी आपला दौरा केला. मी राज्यातील शेतकऱ्यांची सेवा करीतच राहीन, असे ठाम वक्तव्यही धनखड यांनी केले.
उपराष्ट्रपती धनखड यांनी शनिवारी राजस्थानात ३ कार्यक्रम घेतले. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, मी माझे काम करीत राहीन. कोणाच्याही वक्तव्याने मी अस्वस्थ होणार नाही. माझ्या मार्गावरून ढळणार नाही. अडथळ्यांना जुमानणार नाही. माझी निवड झाल्यानंतर राजस्थान भेटीचे माझे कार्यक्रम फारच पूर्वीच निश्चित झाले होते. मी इथला भूमिपुत्र आणि शेतकरी आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी माझे कार्यक्रम ठरविण्यात आले होते.
धनखड यांचे जोधपूरमध्ये जलशक्तिमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी स्वागत केले. या आठवड्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री गेहलोत यांनी म्हटले होते की, धनखड यांच्या राजस्थान भेटीला माझा विरोध नाही. तथापि, राज्य निवडणुकांना सामोरे जाणार असताना उपराष्ट्रपतींनी सरकारी हेलिकाॅप्टर वापरून एकाच दिवसात तीन-तीन कार्यक्रमांना हजेरी लावणे टाळायला हवे.धनखड यांनी गेहलोत यांचा हा सल्ला धुडकावून लावला. धनखड म्हणाले की, मी मालपुरा, भरतपूर, बिकानेर, आयसीएआर सेंटर, सुरतगढ आणि इतर अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. माझ्या भेटींना कोणी का आक्षेप घ्यावा? मी हे सगळे शेतकऱ्यांच्या हितासाठी करीत असताना अशा प्रतिक्रियांमुळे मला वेदना झाल्या.