नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या धुक्यामुळे रस्तेवाहतुकीवरही विपरित परिणाम झाला असून, दिल्लीतील सिंधू बॉर्डर परिसरात धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये चार पॉवरलिफ्टर्सचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
दिल्ली-चंदीगड महामार्गावरील सिंधू बॉर्डर येथे हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कारची डिव्हायडर आणि खांबाला धडक बसली. त्यामुळे चार खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. त्याबरोबरच दाट धुकेही पडत आहे. रस्त्यांवर प्रचंड धुके असल्याने वाहने पुढे सरकण्यात अडथळे निर्माण होत आहे. परिणामी दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच हरयाणा व पंजाबमध्ये वाहतूक मंद गतीने सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे.