भूमिगत गटारच्या खड्ड्याने घेतला बालकाचा बळी
By admin | Published: February 08, 2016 2:14 AM
औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेसाठी २० फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चेलीपुरा परिसरातील काचीवाडा भागात ही घटना घडली. अग्निशामक दलाने शनिवारी मध्यरात्री बालकाचा मृतदेह शोधून काढला. महापालिका आणि कंत्राटदाराच्या वादात भूमिगत गटार योजनेचे काम बंद पडल्याने ही घटना घडल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेसाठी २० फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चेलीपुरा परिसरातील काचीवाडा भागात ही घटना घडली. अग्निशामक दलाने शनिवारी मध्यरात्री बालकाचा मृतदेह शोधून काढला. महापालिका आणि कंत्राटदाराच्या वादात भूमिगत गटार योजनेचे काम बंद पडल्याने ही घटना घडल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.आकाश बाळकृष्ण जाधव (९) असे मृत बालकाचे नाव आहे. खाराकंुआ भागातील गुजराती विद्यालयात तो इयत्ता दुसरीत शिकत होता. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला. रात्री आठपर्यंत आकाश घरी न आल्याने त्याच्या आई- वडिलांनी परिसरातील नागरिकांसह शोध घेण्यास प्रारंभ केला. भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकण्यासाठी काचीवाडा येथील नाल्यात १५ ते २० फूट खोल खड्डे खोदले आहेत. ड्रेनेजच्या घाण पाण्याने हे खड्डे तुडुंब भरले आहेत. या नाल्याजवळ आकाश खेळत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी त्याच्या वडिलांना सांगितले. जाधव यांनी ही बाब सिटीचौक पोलिसांना कळविली. त्यानंतर अग्निशामक दलाने रात्री नऊच्या सुमारास नाल्यातील खड्ड्यात शोधमोहीम राबविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तीन तासांनी म्हणजे रात्री बाराच्या सुमारास आकाशचा मृतदेह सापडला.---मनपावर कारवाई कराकाचीवाडा भागातील या खड्ड्यात यापूर्वीदेखील तीन ते चार जण पडले होते; परंतु वेळीच मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले होते, असे नागरिकांनी सांगितले. महापालिका आणि कंत्राटदार यांच्या वादात भूमिगत गटार योजनेचे हे काम गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्यानेच आकाशचा मृत्यू झाल्याचा आरोप करून महापालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरिक रविवारी रात्री सिटीचौक ठाण्यात ठाण मांडून होते.