व्हिक्टोरिया गौरी यांनी घेतली पदाची शपथ, नियुक्तीच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 08:28 AM2023-02-08T08:28:51+5:302023-02-08T08:29:52+5:30
व्हिक्टोरिया गौरी यांची वादग्रस्त विधाने व त्यांची राजकीय पार्श्वभूमी या आधारे त्यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले होते.
नवी दिल्ली : विधिज्ञ एल व्हिक्टोरिया गौरी यांनी मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.
व्हिक्टोरिया गौरी यांची वादग्रस्त विधाने व त्यांची राजकीय पार्श्वभूमी या आधारे त्यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले होते.
सरकारने व्हिक्टोरिया गौरी यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. तथापि, यापूर्वीही राजकीय पार्श्वभूमी असलेले लोक सर्वोच्च न्यायालयातही न्यायाधीश झाले आहेत, असे सांगत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
२१ वकिलांनी केला होता विरोध
गौरी यांना न्यायाधीश बनवण्याच्या निर्णयाला मद्रास न्यायालयातील २१ वकिलांनी विरोध केला होता. वकिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून कॉलेजियमने व्हिक्टोरिया गौरींच्या नियुक्तीची केलेली शिफारस मागे घेण्याची विनंती केली होती. व्हिक्टोरिया गौरी या भाजपच्या नेत्या असल्याचा दावा या वकिलांनी केला होता.