रामपूर : समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या शाही ७५ व्या वाढदिवसासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीवरून वाद उफाळला आहे. मुलायम यांच्या मिरवणुकीसाठी लंडनहून खास व्हिक्टोरियन बग्गी आयात करण्यात आली. दरम्यान, त्यांचे कट्टर समर्थक मंत्री आझम खान यांनी तालिबान आणि दाऊद इब्राहिमकडून पैसा मिळाल्याचे उपरोधिकपणे सांगत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.मुलायमसिंह यांच्या मिरवणुकीत बग्गीवर त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र मुख्यमंत्री अखिलेश यादव, मंत्री आजम खान हे स्वार झाले होते. ४० मंत्र्यांसह हजारो समर्थक या बग्गीसोबत होते. जौहार विद्यापीठात मुलायम यांनी ठीक मध्यरात्रीच्या ठोक्याला ७५ फूट लांब केक कापून वाढदिवस साजरा केला. रामपूर या खान यांच्या मतदारसंघात शुक्रवारी दोन दिवसांच्या वाढदिवस सोहळ्याला प्रारंभ झाला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आझम खान यांनी पूर्ण ताकद झोकली आहे. दरम्यान, या सोहळ्यावर खर्च होणाऱ्या पैशाचा वाद उफाळला आहे. पैसा कुठून आला, या प्रश्नावर ते संतापून म्हणाले की, काही पैसा तालिबान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अबू सालेम व काही पैसा अतिरेक्यांकडून आला आहे. (वृत्तसंस्था)