अहमदाबाद - आम्ही अत्यंत सहज जिंकलो असून, आमच्या मतांच्या टक्क्यात वाढ झाली आहे. स्पर्धा वैगेरे अजिबात नव्हती असं भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील जनतेचे आभार मानले.
'हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांचा, विकासाचा विजय आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजय वंशवाद आणि जातीयवादाला उत्तर आहे', असं अमित शहा म्हणाले आहेत. 'काँग्रेसने आऊटसोर्सिंग करत निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते पराभूत झाले आहेत. प्रचाराचा स्तर एवढा खाली आलेला मी कधीच पाहिला नव्हता', अशी टीका त्यांनी केली.
हिमाचल प्रदेशातील जनतेने आम्हाला मोदींच्या विकासाच्या प्रवासात सामील होण्याची इच्छा असल्याचं दाखवून दिलं आहे असं अमित शहांनी सांगितलं. 'आम्ही 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जेव्हा निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हा पुन्हा एकदा आम्हाला लोकांचा समर्थन मिळेल. 2022 मध्ये नरेंद्र मोदींचं स्वप्न सत्यात उतरेल', असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. येणा-या चार राज्यांमधील निवडणुका आम्ही जिंकणार आहोत. कर्नाटकातही आम्ही जिंकू असाही दावा त्यांनी केला. जातीवाद आणि वंशवादावरुन राजकारण करणा-यांना हा धडा आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला लोकांचा मोठा पाठिंबा असल्याचं दिसत आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना विजयाचं श्रेय देत त्यांचे आभार मानले.
'गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निकालावरुन सुशासन आणि विकासाला जबरदस्त पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे. दोन्ही राज्यांमध्ये विजय मिळवून देण्यासाठी मेहनत घेणा-या कार्यकर्त्यांना माझा सलाम', असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. पुढे त्यांनी सांगितलं की, 'भाजपावर दाखवलेल्या विश्वास आणि प्रेमासाठी मी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील लोकांना नमन करतो. दोन्ही राज्यात विकासासाठी सर्वोपतरी प्रयत्न करु'.